Ad will apear here
Next
भास्कर चंदावरकर, प्रभाकर बरवे, मल्हारराव होळकर, राजपाल यादव, डी. के. सप्रू
नामवंत संगीतकार भास्कर चंदावरकर, चित्रकार, कवी प्रभाकर बरवे, मल्हारराव होळकर, अभिनेता राजपाल यादव आणि चरित्र अभिनेते दयाकिशन उर्फ डी. के. सप्रू यांचा १६ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
.........
भास्कर चंदावरकर
१६ मार्च १९३६ रोजी भास्कर चंदावरकर यांचा जन्म झाला. श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’सारखी अजरामर नाट्यकृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक म्हणजे भास्कर चंदावरकर. त्यांनी पं. रविशंकर व त्याच्या पत्नी अन्नपूर्णादेवी यांच्याकडून सतारवादनाचं शिक्षण घेतलं. 

चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. त्यानंतर, त्यांना पश्चिमेकडचं संगीत खुणावू लागलं होतं. त्यामुळे टॉन द ल्यू, जोसेफ अँटोन रिडल आणि डिटर बॅच यांच्याकडून त्यांनी जॅझचे धडेही गिरवले होते. संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केले. विशेष म्हणजे प्रभा मराठे यांच्या दोन नृत्यनाटिकांसाठी दोन तासांचं दिलेलं संगीत चांगलंच गाजलं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी १५ वर्षं संगीत प्रशिक्षक म्हणून काम केलं. 

एकीकडे विद्यादानाचे काम सुरू असतानाच, १९७०पासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. त्यापैकीच एक प्रयोग १९७२मध्ये क्लिक झाला. विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ला त्यांनी दिलेले संगीत मराठी नाट्यरसिकांना भावले. आपोआपच चित्रपटांचा भव्य पडदा खुला झाल्याने चंदावरकर यांच्या प्रयोगशील वृत्तीला बहरच आला. मराठी, हिंदीसोबतच, पाश्चात्य चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबदारीही त्यांनी उत्साहाने उचलली आणि ती यशस्वीपणे पेलली होती. 

संगीतकार म्हणून ‘घाशीराम कोतवाल’च्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा ‘सामना’ हा सिनेमा चांगलाच गाजला. ‘सामना’मधली त्यांची गाजलेली गाणी रसिक श्रोते कधीच विसरू शकणार नाहीत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे याच सिनेमातले गाणे. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली. भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे. 

अनेक भारतीय भाषांमधले सुमारे ४० चित्रपट भास्कर चंदावरकरांनी आपल्या संगीतानं सजवले. मृणाल सेनचा ‘खंडहर’, अपर्णा सेनचा ‘परोमा’, अमोल पालेकरांचा ‘थोडासा रुमानी हो जाए’, विजया मेहतांचा ‘रावसाहेब’, जब्बार पटेलांचा ‘सामना’, ‘सिंहासन’, तसेच ‘आक्रित’, ‘कैरी’, ‘मातीमाय’ हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट. श्वास या चित्रपटासाठी चंदावरकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं. भास्कर चंदावरकर यांचे २६ जुलै २००९ रोजी निधन झाले. 
.....
प्रभाकर बरवे
१६ मार्च १९३६ रोजी प्रभाकर बरवे यांचा जन्म झाला. चित्रकारांच्या तीन पिढ्यांवर केवळ दृश्यविचारातून प्रभाव टाकणारे, चित्रकलेशी संबंध नसलेल्या रसिकांनाही ‘कोरा कॅनव्हास’ या अजरामर पुस्तकामुळे माहीत असलेले प्रभाकर बरवे हे १९५९पासून चित्रकार म्हणून परिचित होऊ लागले. एवढ्या काळात त्यांनी कलाविद्यार्थी, कला-अध्यापक आणि कलासमीक्षकांना प्रभावित केले होते. याचे कारण त्यांचा दृश्य-विचार! 

रोजचे ‘मध्यमवर्गीय, मराठी’ जगणे अजिबात न नाकारता, रोजच्याच दृश्यांच्या विचारी मांडणीतून व्यापक आशय सुचवण्याची ताकद बरवे यांच्या चित्रांमध्ये होती. १९८०च्या दशकापासून कॅन्व्हासवर तैलरंगांऐवजी घरच्या भिंतीचा ऑइलपेंट म्हणजे ‘एनॅमल पेंट’ वापरून त्यांनी चित्रांना निराळे दृश्यरूप दिले. त्याहीआधी वाराणसीच्या मुक्कामापासून, भारतीय ‘तांत्रिक’ परंपरेतील चित्रेही त्यांनी काढली होती. परंतु बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहते ते अशा सुट्या-सुट्या चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काही तरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, तर नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. 

याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला! याच चित्रविचारामुळे, चित्रकला आणि साहित्य यांचा संबंध नाही, या अनेकांच्या भ्रमांचे समूळ उच्चाटन झाले. बरवे यांचे दृश्यकलेखालोखाल प्रेम होते ते कवितेवर. त्यांच्या काही कविता साहित्याला वाहिलेल्या ‘सत्यकथा’ ह्या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचे आवडते कवी म्हणजे ऑक्टोविया पाझ व बालकवी. त्यांच्या बऱ्याच चित्रांची शीर्षकेही काव्यात्मक आहेत. जसे, ‘अदर शोअर’, ‘रिवर ऑफ सायलेन्स’, ‘दी लास्ट कॉल’ वगैरे. 

एकदा ते म्हणाले, की त्यांच्या ‘ब्लू क्लाऊड’ या चित्राची प्रेरणा आहे कालिदास यांच्या मेघदूत या काव्यात. त्यांना त्यातील ढग हा संदेशवाहक दूत ही कल्पना आवडली होती. प्रभाकर बरवे यांचं ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक मराठीतल्या उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत गणले जाते. प्रभाकर बरवे यांचे निधन सहा डिसेंबर १९९५ रोजी झाले.
.........


मल्हारराव होळकर
१६ मार्च १६९३ रोजी मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. त्यांचं गाव पुण्यानजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा होता. 

दाभाड्यांचा सरदार कंठाजी कदमबांडे याच्या पेंढारी टोळीत मल्हाररावांनी शिपाई म्हणून काम केलं. याच काळात बाजीराव पेशवे आणि मल्हारराव यांची मैत्री झाली. यानंतर मल्हाररावांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांनी शिपाई ते थेट सरदार असा प्रवास केला. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली.

१७२८ची निजामाबरोबरची महत्वाची लढाई असो किंवा १७३७ची दिल्लीची लढाई असो, तसेच १७३८ सालची भोपाळची लढाई असो, मल्हाररावांची समशेर कायम तळपत राहिली. त्यांचा दबदबा तयार झाला आणि त्यांना ‘किंग मेकर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच काळात इंदोरची रियासत होळकर घराण्याकडे आली.

मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान म्हणजे ‘अटकेपार झेंडा’. पाकिस्तानातील अटकेपर्यंत भगवा झेंडा जाऊन पोहोचला होता. यात राघोबादादांबरोबर खांद्याला खांदा भिडवून मल्हारराव आघाडीवर होते. अटक काबीज करण्याआधी १७५८ साली सरहिंद आणि लाहोरदेखील काबीज करण्यात आलं होतं. या तर एक म्हण मराठीत कायमची रुजली - ‘अटकेपार झेंडा रोवणे.’

१६ जानेवारी १७६१ साली पानिपतची लढाई झाली. पानिपतनंतर स्वराज्य पुन्हा उभारण्याच्या हेतूने त्यांनी अनेक मोहिमा आखल्या. तोपर्यंत नानासाहेब पेशव्यांचे धाकटे चिरंजीव ‘माधवराव’ पेशवे झाले होते. या मोहिमांच्या धामधुमीतच आलामपूर येथे मल्हारराव होळकर यांचे २० मे १७६६ रोजी निधन झाले. 
.....


राजपाल यादव
१६ मार्च १९७१ रोजी राजपाल यादवचा जन्म झाला. राजपाल यादवने १९९९मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. राजपाल यादवने ‘अता पता लापता’ या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केले होते. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘दगडाबाईची चाळ’ या मराठी चित्रपटातही त्याने काम केले आहे.
.........
दयाकिशन उर्फ डी. के. सप्रू 
१६ मार्च १९१६ रोजी डी. के. सप्रू यांचा काश्मिरात जन्म झाला. एक टॅलेंटेड, हँडसम आणि निळ्या डोळ्याचा काश्मिरी अभिनेता म्हणून दयाकिशन सप्रू यांची बॉलिवूडला ओळख होती. यांचे पाच एप्रिल १९७९ रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर











 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZSFCK
Similar Posts
सुरुची अडारकर, श्रिया पिळगांवकर, स्नेहलता तावडे-वसईकर, वैशाली सामंत, अरिजित सिंग अभिनेत्री सुरुची अडारकर, अभिनेत्री श्रिया पिळगांवकर, अभिनेत्री स्नेहलता तावडे-वसईकर, प्रसिद्ध गायिका, संगीतकार वैशाली सामंत आणि प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांचा २५ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language